(लॉकडावूनच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने हा मागच्या एका वर्षाचा आढावा.. तुम्हाला आणखी काही नाव आठवली तर तुम्हीही कमेंट करा)
साधारणपणे बरोबर एक वर्षांपूर्वी याच दरम्यान त्याच्या येण्याची चाहूल लागली होती. आणि आज वर्षभरानंतर त्याच्या असण्याची सवय झालीय. हा जो वर्षभराचा प्रवास आहे ना त्यात कोरोना नावाच्या विषाणूसोबत माझ्या लाल मातीमधल्या माणसाच्या अंगात नव्याने वाढलेली जी कोकणी माणसाची अँटीबॉडी तयार आहे ना त्याबद्दलचा हा लेखप्रपंच आहे.
मुळात गावाकडे सुखाने जगणारा , मुंबईत फक्त नोकरीच्या मागे घड्याळासोबत धावणारा , आणि निवृत्तीनंतर कसलीही ददात नसणारा अशा साहित्यिक व्यक्तिचित्रणातून रेखाटलेला जो कोकणी माणूस आहे त्याला त्याच्यात प्रतिमेतून बाहेर काढणारा जर कुठला काळ असेल तर हा काळ म्हणजे हा कोरोना काळ असे मी नक्की म्हणेन. मागच्या वर्षभरात वेशीवरुन माझे गाव पाहताना आणि त्याचवेळी मुंबईतला कोकणी माणूस पाहताना मला पहिल्यांदाच जे आर्थिक आणि सामाजिक अभिसरण झालंय त्यातून बदललेल्या एका नव्या मानसिकतेची वाट दिसतेय.
आर्थिक, सांस्कृतिक, आणि एकूणच अशा तीन टप्प्यातून जेव्हा मी चाकरमानी पाहतो तेव्हा मला त्याच्या सेकंड इन्कमबद्दल जागृत झालेल्या जाणिवा दिसतात, करियर फोकस लाईफ याला आता महानगरांची गरज उरली नसल्याचे दिसतय, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे धावत्या शहरातला डिस्टर्बन्स त्याला पुन्हा गावाकडे ओढतोय. या सगळ्यात पुन्हा गावाकडे चला, आपल्या कोकणचा विकास आपण करूया असले काही फार मोठे समाज प्रबोधनात्मक नाही आहे, तर साधा सरळ विचार आहे की होय मला कम्फर्टनेस हवाय जो मला आता पैशापेक्षाही जास्त मिळेल.
मुंबईतल्या नव्या आत्मनिर्भर चळवळीच्या उल्लेखात मी काही गोष्टींचा विशेष उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. सुवर्ण कोकणच्या सतीश परब यांनी लॉकडावूनमध्ये घरी बसलेल्या चाकरमान्याला 'तुमचे घर हेच तुमचे नवे हेडक्वार्टर' हे सुचवून एप्रिल ते जुलै सलग फेसबुक लाईव्ह सेमिनार केले आणि त्यातून आजपर्यंत न दिसलेली घरची श्रीमंती नव्याने उलगडत गेली. मसाला आणि किराणा या वस्तूतुन केवळ डी मार्ट नाही तर आपणही फार नाही पण श्रीमंत होऊ शकतो हा विश्वास मिळाला.
ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, काथ्या महामंडळाचे सुनील देसाई यांच्यासारख्या दिग्गज वक्त्यांनी जो उद्योजकीय जागर सुरु केला त्या सगळ्याला झुम, फेसबुक, इंस्टा लाईव्ह, गुगल डुओ अशा माध्यमातून एक वेगळं माध्यम मिळालं. सोशल मीडियाचा मागच्या वर्षात जर जगभरात प्रभावीपणे कोणी वापर केलाय तर मुंबईपासून सिंधुदुर्ग पर्यंत पसरलेल्या कोकणी माणसाने !
सोशल मीडियाचा वापर करून नवनवे मालवणी ब्रँड तयार झाले. मुळात नोकरी ही मानसिकता तयार झाली. दर्शन नेवरेकर, अर्चना परब, पौर्णिमा गावडे मोरजकर, सुवर्णा वायंगणकर, श्रद्धा ढोलम, वर्षा तळेकर, नितीन गोलतकर, वैशाली कदम, परेश आचरेकर हे मालवणी सोशल मीडियावरील सगळे स्टार आयकॉन स्वतः उद्योग क्षेत्रात उतरले आणि त्याचा जो प्रभाव समोर आला तो या सगळ्या नव्या बदलांना अनेकांना आपणही काय तरी करावं असे मुंबईत प्रेरक बनू गेलं.
मसाले, तांदूळ, लाडू या भेटवस्तू नाहीत तर ती उदिमाची साधन असू शकतात हा एवढी वर्ष ओरडूनही समजला नाही तो बदल एका वर्षात झाला. मालवणी घरगुती जेवण संस्कृती आणि त्याचे अर्थकारण आता झोमेटो, स्वीगी, उबेर इट्स, फूड पांडा या फूड डिलिव्हर सर्व्हिसेसवर रिफ्लेक्ट झालाय. थोडे वेगळं उदाहरण म्हणणे वैभव गावडे, महेश चेंदवणकर यांच्या सारख्या मुंबईकर तरुणांनी बागेतून आंबा थेट तुमच्या घरात आणण्यासारखे केलेलं नवे ऑनलाईन काम हे खूप मोठे आहे, या क्षेत्रात आजून अनेकजण उतरले तरी प्रत्येकाचे नाव हे ब्रँडनेम होईल. मालवणी माणूस आता स्वतःकडे वेगळ्या नजरेने बघतोय, हीच नजर त्याला या मागच्या ठप्प झालेल्या जगण्याने दिलीय.
सगळ्यात मोठा जागर झाला असेल तर तो कोकणच्या आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांकृतिक विश्वात. मुंबईत मागच्या काही वर्षात गावाकडून मुंबईत देहाने स्थायिक झालेली नवी पिढी आहे. जी मंडळी देहाने मुंबईत असतात मनानं कायम गावात पडीक असतात. त्यांच्या सोशल मीडियावरही मुंबईतील श्रीमंत ठिकाणे नसतात तर गावची लोकेशन असतात. आणि या सगळ्यांनी गावपण नव्याने उलगडलं.
सिंधुदुर्ग- स्वर्गाहुन सुंदर, आम्ही मालवणी, ग्लोबल मालवणी, माझा सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग प्रतिष्ठान, मालवणचो कटटो , गाव गाता गजाली, बायग्या, गरजलो रे गरजलो, मालवणचो कटो यासारख्या फेसबुक पेजच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सांस्कृतिक भावविश्व नव्याने उलगडत गेले. सोशल मीडिया ही मजेची नाही तर समजून घेण्याची गोष्ट आहे ही मुंबईकर पेजनी एवढ्या अप्रतिम सांगितली की लोकांनी टीव्ही बघणे सोडून फेसबुक लाईव्ह पाहणे पसंद केलं होतं. भजन दशावतार, कथाकथन, निवेदन, असे एक क्षेत्र नव्हते आणि असे एक माध्यम नव्हते की जी नव्याने उलगडले नव्हते. राजा दळवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दशावतार आणि भजन कलेला खऱ्या अर्थाने नव्या पिढीपर्यंत नेण्याचा एक ग्लोबल प्रयत्न केला. अर्चना परबच्या 'मयेकारणीच्या गजालीने' मालवणी परफॉर्मन्सला एक नवा रिफॉर्म दिलाय. 'साई जळवी फिल्मस'च्या मालवणी रायता, 'तिठ्या वयले गजाली', 'कॅज्युअल मालवणी' अशा नावाने विनोदाचा आणि जगण्यातला दर्जा दाखवताना चाकरमान्याचे रडू थांबवलं. मुळात जितकी नाव घ्याल तितकी कमी एवढा मोठा प्लॅटफॉर्म मागच्या एका वर्षात बांधून झालाय. अगदी 'नवरा नवरी डॉट कॉम' नव्या मालवणी चाकरमानी पिढीसाठी मेट्रोमोनिएल साईट असो किंवा चित्रकार सतीश नाईक यांची 'मालवणी मॉल' हा नवा प्रयोग असेल. सगळच भन्नाट मालवणी आहे.
माझा सिंधुदुर्गने तर सामान्य चाकरमानी माणसाचे आत्मचरित्र हा मोठ्या निबंधाचा विषय केला आणि प्रत्येकाच्या आयुष्यात जो संघर्ष आहे तो वाचून अनेकांना आपल्या आयुष्याचे सुख समजले. आपला दावा आहे, मागच्या एका वर्षात फेसबूकने मालवणी हा शब्द केवळ व्हिज्युअली सर्च मारला तरी आमची सगळी चॅनल ही टीव्ही सारखी पे फेसबुक चॅनल होतील, एवढा दर्जा आणि व्हीवरशिप मिळालीय.
अर्थात मी सगळ्यांनी सगळं ओळखत नाही, पण जी जी उदाहरण समोर आलीत ती कमालीची प्रेरक आहेत. महेश तारीसारखा चाकरमानी गावचे गावठीपण चाकरमान्याना 'लाल चिरा' च्या अभिनव हॉटेल संस्कृतीतून उलगडतोय. माझ्या काही विनय जैतापकर सारख्या मित्रांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी कायमचे गावाकडे गावच्या शाळेत नाव नोंदवलंय. मुळात दररोजच्या जगण्यात महागाईतून शिक्षण खर्च वजा केला तर ही उदाहरण फार महत्वाची आहेत. मूळचे व्यावसायिक असतानाही आबा भोजणेसारखे धडपडे तरुण हळद, मका, शेवगा लागवडीकडे वळलेत. मालवणी मसाल्यात घाटी मिरची का हा प्रश्न स्वतःला विचारत गोव्यात अमित वेंगुर्लेकर या आमच्या मित्राने गोमंतकीय मालवणी मसाला हा वेगळा स्टार्ट अप बनवून बाजारात आणलाय. दिनेश आंगणे सारखे मित्र मुंबई सोडून गावाकडे शेअर बाजार ट्रेंड करतोय. ही उदाहरण खूप वेगळी आहेत. कदाचित तुमच्या प्रत्येकाच्या पाहण्यात आलेली तुमची उदाहरणे यापेक्षा अफाट असतील. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जमतील
ठप्प झालेल्या अर्थकारणात ज्याला फक्त चाकरमानी जगणारा म्हणून आपण पाहिलं ना तो आता बदललाय. अर्थात या सगळ्या बदलात ना कुठली राजकीय चळवळ होती ना सामाजिक चळवळ होती. त्याच्या या बदलात त्याला सोशल मीडियाने त्याला जागं केलं.आजही कोकणी माणसाच्या या बदलात प्रगत लोके, लक्ष्मीकांत कांबळी या बदलाचे नवे डॉक्युमेंटेशन करतायत.
प्रत्येक मालवणी माणसाने नात्यातला, गावातल्या आणि जगण्यातला गोड कडवट क्षणांचे अनुभव घेतलेत. त्याला आता कसलीच फिकीर नाहीय. गणपतीला गावी न जाण्याचे दुःख सहन करणारा माणूस आता कुठल्याच दुःखाची तमा नाही बाळगत, ना गावकीचे ना भावकीचे ! फक्त आता जगण्याचा फोकस क्लिअर झालाय. त्याची कनेक्टिव्हिटी आता क्लिस्टर क्लिअर झालीय.. अगदी लेखाच्या शीर्षकाची पुढची ओळ झालीय..
'झाले मोकळे आभाळ' !
-ऋषी श्रीकांत देसाई

إرسال تعليق